विविध संसर्गजन्य आजार
१. कांजण्या (Chickenpox )
रोगाचे स्वरूप :
कांजण्या हा 'व्हेरीसेला झोस्टर' नामक विषाणूमुळे सामान्यतः लहान मुलांना होणारा संसर्गजन्य रोग होय. हया रोगात ताप, प्रचंड थकवा, अंगदुखी व पाणी भरलेले बारीक फोडासारखे पुरळ ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. कांजण्या भारतात सर्वसामान्यपणे आढळणारा हा रोग आहे. काही भागात हा रोग वर्षभर थोडयाफार प्रमाणात आढळतो. तसेच अशा भागात दर दोन ते पाच वर्षानी साथीच्या स्वरुपात
सुध्दा आढळतो.
साथरोग शास्त्रीय घटक
कारक :
व्हेरीसेला झोस्टर विषाणु
संसर्गस्त्रोत :
कांजण्या रोगाचा रुग्ण
संसर्गजन्य पदार्थ :
रुग्णाच्या नाक व घशातील स्त्राव, त्वचेवरील फोडातील द्रव.
कांजण्या झालेल्या रुग्णाच्या त्वचेवरील फोडाच्या खपल्या संसर्गजन्य नसतात. संसर्गक्षम कालावधी : कांजण्या रोगाचा रुग्ण अंगावर पुरळ उठण्याच्या १ ते २ दिवस आधी पासून ते पुरळ उठल्यावर ४ ते ५ दिवसापर्यंत साधारणतः १ आठवडाभर सांसर्गिक असतो.
वयोगट साधारणतः
१० वर्षाखालील मुलात प्रामुख्याने होणारा रोग आहे. या रोगाविरुध्द प्रतिकार शक्ति नसेल तर हा रोग कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला होऊ शकतो. क्वचित प्रसंगी रोग परत उद्भवू शकतो. रोगप्रसाराचे माध्यम रुग्णाच्या नाक व घशातील स्त्रावाचे तुपार किंवा रुग्णाच्या संसर्गजन्य स्त्रावामुळे दूषित झालेल्या वस्तुंमुळे देखील रोग प्रसार होतो. अधिशयन काळ कमीत-कमी ७ दिवस व जास्तीत जास्त २१ दिवस.
रोगलक्षणे :
ताप आणि पुरळ ही या रोगातील प्रमुख लक्षणे आहेत. त्वचेवरील पुरळ स्वच्छ द्रव भरलेल्या बारीक फोडासारखे असतात. पुरळ २४ तासाचे आत येऊन साधारणतः ५ दिवसात पूर्णत्वास जाते. छाती, पाठ व पोटावर पुरळ जास्त असतात तर चेहरा व हातापायावर कमी असतात व काखेमध्ये हमखास येतात. तळव्यावर पुरळ उठत नाही. पुरळ उथळ व त्वचेच्या वरच्या भागावर असतात. पुरळाच्या चार अवस्था दिसून येतात बारीक पुरळ, पुटकुळी, द्रवयुक्त पिटिका व खपली लहान मुलात कांजण्या हा रोग सौम्य असतो मात्र प्रौढामध्ये उग्र स्वरूप धारण करतो. हया रोगात मृत्यूदर १.२ टक्के असतो.
गुंतागुंत :-
रक्तस्त्राव, श्वसनदाह, मेंदूदाह, गरोदरपणात कांजण्या झाल्यास गर्भपात
तसेच होणा-या बालकात व्यंग,
संदर्भ सेवा :-
वरील प्रकारची गुंतागुंत झाल्यास रुग्णास संदर्भ सेवा द्यावी.
उपचार व नियंत्रण :
१. आरोग्य विभागास रुग्णाबाबत वर्दी देणे.
२. सर्वसाधारणतः एक आठवडयासाठी रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे. शाळेत जाणारे
मूल असल्यास त्यास शाळेत जाऊ न देणे.
३. रुग्णाने वापरलेल्या वस्तूचे निर्जंतुकीकरण करणे.
४. ताप असल्यास पॅरासिटॅमॉल देणे.
५. कैलामिन द्रावण पुरळावर लावणे.
६. पुटकुळयांना जिवाणूसंसर्ग झाल्यास जेन्शन व्हायोलेट लावणे.
प्रतिबंधन
कांजण्या रोगाविरुध्द जिवंत पण निष्क्रीय केलेल्या जंतूची लस उपलब्ध आहे. परंतु या लसीचा वापर अद्याप नियमितपणे केला जात नाही.
कांजण्याविषयी समाजात खालील प्रमाणे माहिती द्या :
१. कांजण्या झालेल्या मुलाची आंघोळ न करणे.
२. अशा रुग्णास भरपूर पातळ पदार्थ भरविणे व पौष्टिक आहार देणे.
३. सर्वसाधारणतः एक आठवडयासाठी रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे. शाळेत जाणारे मूल असल्यास त्यास शाळेत जाऊ न देणे.